मी बोलतेय..हो हो मीच..

माझं नाव? ठाऊक नाही..

गाव? ठाऊक नाही..

माझं घर? मी राहत होती अश्या एका ठिकाणी जिकडे माझ्याच सारखी अनेक मुलं होती.. ज्यांना नाव,गाव, आई, बाबा...काही ही ठाऊक नाही..

अनाथाश्रम...

हो, मी अनाथ आहे. 

मी अगदी लहान असल्यापासून इथेच रहायचे. इथल्या मावशी, दादा यांनीच माझा सांभाळ केलांय..

आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, मामा..कुणी कुणी नाही..

आता तुम्ही म्हणाल भीती नाही वाटत? भीती? ती काय असते?

बालपणापासून इथेच रहायचे,आजूबाजूला अनेक मुलं असायची, लहान, मोठी..पण मनातून मात्र एकटीच..तशी सवयच झालीय आता..

ना आई,बाबा ना भाऊ बहीण..

इथे सगळीच मुलं तशी..

आमचं जीवन असंच असतं..

ज्या क्षणी आई-वडिलांच्या मनात येतं की मूल नकोय त्याक्षणी आमची रवानगी त्या घरातून होते..

काही बाबतीत नियती याहून क्रूर असते.. आई वडील प्राण गमावतात.. 

कुठलंही कारण असो..पण भोग मात्र आमच्याच वाट्याला.

  बालपण म्हणजे आईच्या कुशीत दडून स्वप्नांच्या दुनियेत रमणे. बालपण हे निरागस, स्वप्नवत असावं.. आई वडिलांचे प्रेम, संस्कार आणि सुखद अनुभवांनी समृद्ध असावं.

आई वडिलांच्या आधाराचं एक सुरक्षित कुंपण असावं.

खेळणी, खाण्या-पिण्याची मौज, वाढदिवस, भेटवस्तू, नवीन कपडे हा सगळा आमच्या आयुष्यातून वगळलेला भाग. जेवणाची भ्रांत असलेल्याला हे सगळं मिळणार तरी कुठून?

लोकांनी दान केलेले शक्यतो जुनेच..कपडे, खेळणे मिळतात...हाच काय तो समाधानाचा भाग.. त्यातच आनंद मानून घ्यायचा. दान द्यायला येणाऱ्यांच्या डोळ्यात प्रेम,आधार या ऐवजी सहानुभूती, दया पाहून स्वतःचीच कीव येते..

निराधार म्हणुन जन्मलेल्याला आधार तरी कोण देणार.. स्वतः स्वतः चा आधार बनायचं हे बालपणीच नकळत आमच्यावर मनावर बिंबवलं जातं.

"बालपण" हा शब्द जणू आमच्यासाठी शापित..

तो बालपणीचा शापित काळ निघून जातो.. नशिबाने शिक्षण मिळालं तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहता..

स्वबळावर जगात वावरू लागता..

पण फार काही बदललेलं नसतं. 

निराधार असल्याची आठवण क्षणो क्षणी करून देणारी माणसं आजूबाजूलाच असतात.. एकटं पाडायचा प्रयत्न करतात. 

आम्हाला एकटेपणाची सवय असल्याने आम्ही त्या ही प्रसंगी खंबीर असतो. 

काही लोकांना लोकांसोबत राहूनही एकटे पणा जाणवतो...त्या पेक्षा आम्हाला लाभलेलं एकटेपण बरं..

निराधार असल्याचे दुःखाचे ओझे घेऊन जगताना कायम वाटत राहते... 

 जन्म दाते या जगात असो वा नसो..

पण कुणी तरी स्वतः च्या आनंदासाठी मला जन्म दिला आणि पोरकं म्हणुन जगण्याचे दुःख मात्र मला भोगावे लागले..

 ही सल जन्म भर मनाला बोचत राहील...

माझा जन्म एका परिपूर्ण कुटुंबात झाला असता तर?

इतर मुलांसारखे स्वप्नवत आयुष्य मला लाभले असते तर??

पण आता मी या जर तर च्या प्रश्नांपासून खूप दूर निघून आले आहे.. 

मी माझं नवं आयुष्य घडवू शकते..मनात ही एक उमेद आहे..

कुटुंबाने दिलेलं नाव, गाव, ओळख नसली तरी अस्तित्व असणार आहे.. 

नवीन माणसं, नवीन अनुभव, नवीन कुटुंब असेल..हे सगळं नक्कीच स्वप्नवत असेल.. 

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे

जातील साऱ्या लयाला व्यथा

भवती सुखाचे स्वर्गीय वारे

नाही उदासी, ना आर्तता

एकाच ह्या जन्मी जणू

फिरुनी नवी जन्मेन मी..

Comments

Popular posts from this blog

यार..

ती..